दूध उत्पादकांना ७५ पैसे दरफरक; सभासदांना १३ टक्के लाभांश, कर्मचाऱ्यांना २५ टक्के बोनस..!
संपादक : सुरज देवकाते
बारामती : बारामती तालुका सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित, बारामतीची ४९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार, (दि.२८) सप्टेंबर २०२६ रोजी कसबा, बारामती येथील ‘शरद सभागृह’ येथे उत्साहपूर्ण व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. संघाच्या कामकाजाचा आढावा घेताना दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांसह आगामी वर्षातील विकासकामांची माहिती सभासदांना देण्यात आली. बारामती दूध संघाचे कामकाज राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार, खासदार पार्थ पवार, युवा नेते जय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, संघाच्या प्रगतीमध्ये स्व. अजितदादा पवार यांचे बहुमोल सहकार्य लाभल्याचे संघाचे चेअरमन किशोर भगवानराव फडतरे यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले.
सन २०२५-२६ या अहवाल वर्षात बारामती दूध संघाचे सरासरी प्रतिदिन २.४६ लाख लिटर दूध संकलन झाले. दूध उत्पादक शेतकऱ्यांना संघाकडून विविध माध्यमातून आर्थिक लाभ देण्यात आला आहे. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात पुरवठा केलेल्या दुधासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर ४० पैसे, तर प्राथमिक दूध संस्थांना प्रतिलिटर ३५ पैसे, असा एकूण ७५ पैसे प्रतिलिटर दूध दरफरक देण्यात आला आहे.
याशिवाय सभासदांना १३ टक्के लाभांश (डिव्हिडंड) देण्यात आला आहे. एप्रिल ते सप्टेंबर २०२५ या सहा महिन्यांच्या पशुखाद्य विक्रीवर दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिपोते २५ रुपये आणि प्राथमिक संस्थांना प्रतिपोते २५ रुपये, असा एकूण ५० रुपये प्रतिपोते दरफरक देण्यात आला आहे. संघाच्या कायम कर्मचाऱ्यांनाही २५ टक्के बोनस तसेच अडीच पगारांचे इन्सेंटिव्ह देण्यात आल्याची माहिती सभेत देण्यात आली.
पाच कोटींच्या स्वयंचलित प्लांटची उभारणी
सन २०२६-२७ या वर्षासाठी संघाने विविध महत्त्वाकांक्षी विकासकामांचे नियोजन केले आहे. माळेगाव येथील नंदन डेअरीमध्ये सुमारे ५ कोटी रुपये खर्चाचा ऑटोमेटिक दुग्धपदार्थ निर्मिती प्लांट उभारण्यात येणार आहे. तसेच १२ मेट्रिक टन क्षमतेचा दूध पावडर प्लांट उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नंदन डेअरी व पशुखाद्य प्लांट, माळेगाव येथे सोलर सिस्टिम उभारणे, नंदन डेअरी येथे मिनरल वॉटर प्लांट उभारणे, तसेच भिगवण रोड, बारामती येथील दूध संघाच्या वसाहतीमध्ये कमर्शियल बिल्डिंग उभारणे आदी विकासकामे प्रस्तावित असल्याचे चेअरमन किशोरे फडतरे यांनी सांगितले. या प्रकल्पांमुळे संघाच्या व्यवसायवृद्धीसह दूध उत्पादक आणि सभासदांच्या हिताला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
या वार्षिक सर्वसाधारण सभेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संदिप बांदल, पी.डी.सी.सी. बँकेचे संचालक संभाजी होळकर, बारामतीचे नगराध्यक्ष सचिन सातव, पंचायत समितीचे सभापती किरण तावरे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वासनाना देवकाते , पी.डी.सी.सी. बँकेचे संचालक रणजित तावरे व दत्तात्रय येळेसर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष रावर्धन शिंदे, जिल्हा परिषद सदस्य करण खलाटे, संघाचे माजी चेअरमन सतीश तावरे, रियल डेअरीचे चेअरमन मनोज तुपे, संघाचे सर्व सभासद, पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी, संचालक मंडळ, व्यवस्थापकीय संचालक डॉ. योगेश राणे, उपमहाव्यवस्थापक (वित्त व लेखा) अमोल चव्हाण, संघाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेच्या शेवटी उपस्थित सभासद व मान्यवरांचे आभार संघाचे व्हाईस चेअरमन पुरुषोत्तम गाढवे यांनी मानले. सभासदांच्या सहभागामुळे आणि खेळीमेळीच्या वातावरणात बारामती दूध संघाची ४९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा यशस्वीपणे पार पडली.

✍🏻मुख्य संपादक – सुरज देवकाते





















