२७ वर्षांच्या सामाजिक व आरोग्यसेवेच्या कार्याची दखल; काँग्रेसकडून डॉ. भिसे यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी
संपादक : सुरज देवकाते
बारामती : पुणे जिल्हा काँग्रेस (दक्षिण)च्या अनुसूचित जाती विभागाच्या अध्यक्षपदी डॉ. विजयकुमार रामचंद्र भिसे यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्रपाल गौतम यांनी प्रदेशाध्यक्ष डॉ. अनिरुद्ध बनकर यांच्या शिफारशीनुसार डॉ. भिसे यांच्या नियुक्तीची घोषणा केली.
डॉ. विजय भिसे यांनी यापूर्वी बारामती शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदासह पुणे जिल्हा काँग्रेसच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी सांभाळली आहे. तसेच काँग्रेसच्या पर्यावरण विभागाचे प्रदेश सरचिटणीस म्हणूनही त्यांनी काम केले आहे. गेल्या २७ वर्षांपासून त्या श्रीमती सोनिया राजीव गांधी फिरता मोफत दवाखान्याच्या माध्यमातून देहू ते पंढरपूर पालखी मार्गावरील वारकऱ्यांना वैद्यकीय सेवा देण्याचे कार्य सातत्याने करीत आहेत.
याशिवाय बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्यांनी अशासकीय सदस्य म्हणूनही जबाबदारी पार पाडली आहे. पक्ष संघटना, सामाजिक कार्य आणि आरोग्य सेवेमधील त्यांच्या योगदानाची दखल घेत पुणे जिल्हा काँग्रेस (दक्षिण)च्या अनुसूचित जाती विभागाची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. डॉ. भिसे यांच्या नियुक्तीमुळे अनुसूचित जाती विभागाच्या संघटनात्मक कामाला अधिक बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यांच्या निवडीबद्दल काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

✍🏻मुख्य संपादक – सुरज देवकाते





















