बारामतीत मायलेकाचा दुर्दैवी अंत; १७ वर्षीय मुलाने घेतला गळफास, आईचाही संशयास्पद मृत्यू..!
संपादक : सुरज देवकाते
बारामती : बारामती तालुक्यातील तांदुळवाडी येथील दादा पाटीलनगर परिसरात एकाच घरात आई व १७ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवार, २१ ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आली. विवेक विजय गावडे (वय १७)( रा: दादा पाटील नगर तांदुळवाडी, मूळ राहणार करावागज बारामती ) याने घरातील पत्र्याच्या अँगलला सुती दोरीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे आढळून आले, तर त्याची आई रमा विजय गावडे (वय ४१) या घरातील खोलीत मृतावस्थेत आढळून आल्या. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय रामदास गावडे हे जी.टी.एन. कंपनीमध्ये रात्रपाळीच्या ड्युटीवर गेले होते. शुक्रवार, २१ ऑगस्ट रोजी सकाळी ते घरी परतले असता घराचा दरवाजा बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी पत्नी रमा व मुलगा विवेक यांना आवाज दिला; मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी शेजारी राहणारे सुरज भिमराव शिंदे यांना बोलावून घेतले. दोघांनी दरवाजा उघडून घरात प्रवेश केला असता आतील खोलीत विवेक हा पत्र्याच्या अँगलला आकाशी रंगाच्या सुती दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. त्याच खोलीतील भिंतीजवळील खिडकीजवळ रमा गावडे या पाठीवर झोपलेल्या अवस्थेत आढळून आल्या.
रमा यांना आवाज देऊन तसेच हलवून उठविण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या शरीराची कोणतीही हालचाल होत नसल्याचे दिसून आले. त्यांच्या गळ्यावर काळसर व्रणही दिसून आल्याची माहिती पोलिसांत दाखल करण्यात आलेल्या खबरमध्ये नमूद आहे. त्यावेळी विजय गावडे यांचे मेहुणे हनुमंत वायसे घटनास्थळी आले व त्यांनी पोलिसांना माहिती दिली. यानंतर विवेक व रमा गावडे यांना उपचारासाठी बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून दोघांनाही उपचारापूर्वीच, २१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजण्यापूर्वी मृत घोषित केले.
या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात मयत रजिस्टर क्रमांक ७८/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. घटनेची नोंद शुक्रवारी दुपारी १२.५४ वाजता करण्यात आली.
सदर घटनेच्या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम तसेच पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी भेट दिली असून सदर घटनेचा प्राथमिक तपास पोलीस निरीक्षक नारायण पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार सुधीर काळे हे करत आहेत. या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. घटनेमुळे तांदुळवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

✍🏻मुख्य संपादक – सुरज देवकाते





















