मोहिमेला रुई ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
बारामती : (दि.०३) दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पाहिलेले स्वच्छ व सुंदर बारामतीचे स्वप्न साकार करण्याच्या उद्देशाने रुई (ता. बारामती) येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. बारामती नगर परिषदेच्या नगरसेविका तथा उपगटनेते संपदा चौधर, प्रा.अजिनाथ चौधर यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या मोहिमेला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून संपूर्ण रुई परिसर चकाचक करण्यात आला.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना अभिवादन करून या अभियानाचा प्रारंभ केला गेला. अजित पवार यांना स्वच्छतेची कमालीची आवड होती, त्याच भावनेतून नगराध्यक्ष सचिन सातव, आरोग्य समिती सभापती नवनाथ बल्लाळ यांच्या विशेष प्रयत्नातून हे अभियान हाती घेण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार, युवा नेते जय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती स्वच्छ व सुंदर राहावी या साठी प्रयत्न केला जाणार आहे.
या स्वच्छता अभियानांतर्गत गावातील मुख्य रस्ते, सार्वजनिक ठिकाणे, शाळा परिसर, नाले तसेच चौकांची स्वच्छता करण्यात आली. ग्रामस्थ, युवक मंडळांचे कार्यकर्ते, महिला बचत गट तसेच विविध सामाजिक संस्थांचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले. सर्वांनी एकत्रितपणे कचरा गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावली तसेच प्लास्टिक कचरा वेगळा संकलित करण्यात आला.
स्वच्छता ही केवळ एका दिवसाची मोहीम नसून ती प्रत्येक नागरिकाची सवय झाली पाहिजे, असा संदेश या अभियानातून देण्यात आला. स्वच्छतेमुळे गावाचे सौंदर्य वाढतेच, शिवाय नागरिकांचे आरोग्यही चांगले राहण्यास मदत होते, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. या उपक्रमामुळे रुई गावात स्वच्छतेबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून पुढील काळातही अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला. संपदा चौधर यांच्या पुढाकारातून झालेल्या या स्वच्छता अभियानाचे गावकऱ्यांकडून कौतुक करण्यात येत आहे.
*चौकट :
“दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्वच्छ व सुंदर बारामतीच्या संकल्पनेला प्रेरणा मानत हा उपक्रम आयोजित करण्यात आला. ग्रामस्थ, युवक मंडळे, महिला बचत गट तसेच विविध सामाजिक संस्थांच्या सहभागातून गावातील रस्ते, चौक, नाले आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करण्यात आली. नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत परिसर चकाचक केला. या अभियानातून स्वच्छतेबाबत जनजागृतीही करण्यात आली.”
संपदा चौधर
(नगरसेविका तथा उपगटनेते बा.न.प)

✍🏻मुख्य संपादक – सुरज देवकाते





















