‘सत्यासाठीची लढाई सुरूच राहणार’ : सोहेल शेख यांची भूमिका स्पष्ट..!
प्रतिनिधी : सुरज देवकाते
बारामती, प्रतिनिधी : बारामती नगर परिषदेमधील कथित भ्रष्टाचार प्रकरण उघडकीस आणणारे सोहेल शेख यांनी आपल्या विरोधात राजकीय दबावातून खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच नगर परिषद प्रशासनातील भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आदेश दिल्यानंतर आपल्यावर दबावतंत्राचा वापर सुरू असल्याचे त्यांनी निवेदनाद्वारे म्हटले आहे.
सोहेल शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी भूसे तसेच दरेकर मॅडम यांच्याविरोधात कोट्यवधी रुपयांच्या कथित भ्रष्टाचाराबाबत त्यांनी तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत नगर परिषद संचालनालयाचे आयुक्त यांनी अधिकृत चौकशी व आवश्यक कारवाईचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे सत्य आणि संविधानाचा विजय झाल्याचे शेख यांनी नमूद केले.
मात्र, या प्रकरणानंतर आपल्यावर दबाव आणण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा आणि राजकीय शक्तींचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. नगर परिषद अधिकारी सचिन खोरे यांच्याशी झालेल्या वादानंतर आपण त्यांच्याविरोधात एनसीआर दाखल केली होती. त्यानंतर वरिष्ठ पोलीस प्रशासनावर दबाव आणून आपल्याविरोधात खोटा एफआयआर दाखल करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
शेख यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, एफआयआरमध्ये नमूद केलेले शिवीगाळ व धमकीचे आरोप पूर्णपणे खोटे आहेत. या कारवाईचा खरा उद्देश म्हणजे नगर परिषदेतील कथित भ्रष्टाचाराविरोधात त्यांनी उचललेला आवाज दाबणे हा आहे. भ्रष्टाचार प्रकरणात तक्रार मागे घेण्यासाठी सातत्याने दबाव टाकला जात असल्याचाही आरोप त्यांनी केला.
घटनेच्या दिवशीचा संपूर्ण व्हिडिओ आणि संबंधित पुरावे आपण सोशल मीडियावर सार्वजनिक करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे एफआयआरमधील आरोप आणि प्रत्यक्ष घडलेली घटना यातील फरक नागरिक व पत्रकार बांधवांसमोर येईल, असे ते म्हणाले. यापूर्वीही आपल्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा करत, न्याय आणि सत्यासाठीची लढाई सुरूच ठेवणार असल्याचे शेख यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानिक अधिकारांच्या बळावर भ्रष्टाचाराविरोधातील संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
प्रसारमाध्यमांनी या प्रकरणाची सखोल दखल घेऊन सत्य जनतेसमोर आणावे, अशी विनंतीही त्यांनी निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

✍🏻मुख्य संपादक – सुरज देवकाते





















