नगरसेवक राहुल वाघोलीकर, सोमनाथ गजाकस, गणेश जोजारे, अमोल कावळे यांच्या स्वाक्षऱ्या
संपादक : सुरज देवकाते
बारामती, (दि. २२ ) स्व. अजितदादा अनंतराव पवार यांना राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेल्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने गौरविण्यासाठी बारामती नगरपरिषदेचा ठराव करावा अशी मागणी स्वीकृत नगरसेवक यांनी पत्राद्वारे केली असून याला सर्व नगरसेवकांनी अनुमोदन दिले आहे. यासंदर्भात नगराध्यक्ष सचिन सातव यांना निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, स्व. अजितदादा पवार यांनी गेल्या सुमारे ३५ वर्षांत बारामती तसेच महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना २०२५-२६ चा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर करण्यासाठी नगरपरिषदेकडून शासनाला प्रस्ताव पाठविण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
नगरसेवकांनी निवेदनात स्व. अजितदादा पवार यांच्या विविध क्षेत्रांतील योगदानाचा उल्लेख केला आहे. त्यामध्ये लोकप्रशासन, कृषी व सहकार, जलसंपदा आणि जनसेवा या क्षेत्रांचा समावेश आहे. निवेदनानुसार, उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून काम करताना महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ५०० अब्ज डॉलर्सच्या दिशेने नेण्यात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले. तसेच बारामती पॅटर्नच्या माध्यमातून शेतकरी, दूध संघ, सहकारी साखर कारखाने आणि विविध सहकारी संस्थांना बळकटी देत सहकार क्षेत्रात आदर्श निर्माण केला. जलसंपदा मंत्री म्हणून त्यांनी सिंचन प्रकल्पांना गती देऊन लाखो एकर जमीन ओलिताखाली आणण्याचे काम केले. राज्यभर दादा आणि कामाचा माणूस अशी ओळख असलेल्या स्व. अजितदादा पवार यांनी जलद निर्णयक्षमता, पारदर्शक कारभार आणि थेट जनसंपर्काच्या माध्यमातून जनतेशी नाळ जोडून ठेवली, असेही निवेदनात म्हटले आहे. ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराचे निकष असलेल्या लोकप्रशासन, समाजसेवा आणि राज्याच्या विकासाशी स्व. अजितदादा पवार यांचे कार्य पूर्णपणे सुसंगत असल्याचे सांगत, बारामतीसह महाराष्ट्रातील नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन नगरपरिषदेकडून शासनाला अधिकृत प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर नगरसेवक राहुल जवाहर वाघोलीकर, सोमनाथ दिगंबर गजाकस, गणेश मोहन जोजारे आणि अमोल रामदास कावळे यांच्या स्वाक्षऱ्या असून याला सर्व नगरसेवकांनी अनुमोदन दिले.

✍🏻मुख्य संपादक – सुरज देवकाते





















