बारामतीकरांच्या मूलभूत सुविधांसाठी नगरसेवक निलेश इंगुले यांचा सभेत पाठपुरावा
संपादक : सुरज देवकाते
बारामती, (दि. १३) : बारामती नगर परिषदेच्या शरदचंद्रजी पवार सभागृहात शुक्रवारी (दि. १२) रोजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी तसेच सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत सर्वसाधारण सभा पार पडली. नागरिकांशी संबंधित विविध विकासकामांसह एकूण ७७ विषय सभेपुढे ठेवण्यात आले. त्यापैकी ७५ विषयांना मंजुरी देण्यात आली, तर दोन विषय नामंजूर करण्यात आले.
या सभेत नगरसेवक निलेश इंगुले यांनी शहरातील विविध सामाजिक व नागरी समस्यांशी संबंधित अनेक महत्त्वाचे विषय मांडून प्रशासनाचे लक्ष वेधले. नगरपालिकेच्या मालकीच्या गाळेधारकांना तसेच घरपट्टीधारकांना दिलासा मिळावा यासाठी गाळे व घरपट्टी माफ करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच गावठाण भागातील नागरिकांवर आर्थिक भार पडू नये, यासाठी पाणीपट्टी वाढविण्यात येऊ नये तसेच घराघरांत पाणीमीटर बसविण्याच्या प्रस्तावाला विरोध करण्यात यावा, अशी ठाम भूमिका त्यांनी सभेत मांडली. वाणी/लिंगायत समाजाच्या धार्मिक व सामाजिक गरजांचा विचार करून समाजासाठी स्वतंत्र दफनभूमी उपलब्ध करून देण्यात यावी तसेच बारामती शहरात जगद्गुरू बसवेश्वर महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणीही इंगुले यांनी केली. याशिवाय सर्वसामान्य बारामतीकरांच्या सेवेसाठी उपलब्ध असलेली शववाहिका सेवा मोफत करण्यात यावी, अशी मागणी करत नागरिकांना दिलासा देण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मुस्लिम समाजासाठी उभारण्यात आलेल्या शादी खान्याचे उर्वरित काम तातडीने पूर्ण करून त्याचे हस्तांतरण संबंधित समाजाकडे करण्यात यावे, अशी मागणीदेखील त्यांनी सभेत केली.
नगरसेवक निलेश इंगुले यांनी मांडलेल्या या विविध जनहिताच्या विषयांमुळे सभेत सामाजिक, धार्मिक आणि नागरी प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी नगरपरिषदेने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

✍🏻मुख्य संपादक – सुरज देवकाते





















