नगरसेविका संपदा चौधर, प्रा.आजिनाथ चौधर व चौधर कुटुंबीयांकडून ११ गुंठे जागा मोफत; जागा उपलब्ध असूनही बारामती नगरपरिषदेकडून स्मशानभूमी उभारणीला विलंब..
बारामती : रुई गावात कायमस्वरूपी स्मशानभूमीची सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः पावसाळ्यात अंत्यविधीची समस्या अधिक गंभीर बनत असून, मृतदेह जाळण्यासाठी नागरिकांना अक्षरशः कसरत करावी लागत आहे.
नागरिकांच्या या गंभीर समस्येची दखल घेत रुई येथील स्थानिक नगरसेविका संपदा चौधर, प्रा आजिनाथ चौधर तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी स्मशानभूमीसाठी ११ गुंठे जागा मोफत दिली आहे. मात्र जागा उपलब्ध होऊनही बारामती नगरपरिषदेकडून या ठिकाणी अद्याप आवश्यक सुविधा उभारण्यात आलेल्या नसल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
गेल्या आठवड्यात रुई गावातील एका सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीचे निधन झाले. अंत्यविधीसाठी चौधर कुटुंबीयांनी उपलब्ध करून दिलेल्या ११ गुंठे जागेचा वापर करण्यात आला. मात्र त्याचवेळी पावसाला सुरुवात झाल्याने अंत्यविधी करणाऱ्या कुटुंबीयांची मोठी तारांबळ उडाली. पावसामुळे चितेवरील अग्नी विझत होता. अशा परिस्थितीत शोकाकुल नातेवाईकांनी पावसात भिजत कशीबशी अग्नी प्रज्वलित करून अंत्यविधी पूर्ण केला. स्मशानभूमीच्या ठिकाणी शेड, चिता बांधणीची व्यवस्था, पाण्याची सुविधा, वीज तसेच अंत्यविधीसाठी आवश्यक मूलभूत सोयी उपलब्ध नसल्याने नागरिकांना अनेक वर्षांपासून अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
एखाद्या कुटुंबातील व्यक्तीचे निधन झाल्यानंतर दुःखाच्या प्रसंगी अंत्यविधीसाठीही अशी धावपळ करावी लागणे ही अत्यंत वेदनादायी बाब आहे. जागा देऊनही सुविधा नाहीत, ही शोकांतिका रुई गावातील नागरिकांची अडचण लक्षात घेऊन नगरसेविका संपदा चौधर, प्रा. आजिनाथ चौधर व त्यांच्या कुटुंबीयांनी सामाजिक बांधिलकीतून स्मशानभूमीसाठी तब्बल ११ गुंठे जागा मोफत उपलब्ध करून दिली. त्यामुळे स्मशानभूमी उभारण्यासाठीचा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागला आहे. मात्र त्यानंतरही बारामती नगरपरिषदेकडून या जागेवर प्रत्यक्ष स्मशानभूमी विकसित करण्यासाठी आवश्यक कार्यवाही होत नसल्याने ग्रामस्थांकडून प्रश्न उपस्थित केला जात आहे.
जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे, तरीदेखील स्मशानभूमी उभारता येत नसेल तर यापेक्षा मोठी शोकांतिका कोणती ? असा सवाल रुई ग्रामस्थांकडून उपस्थित होत आहे. पावसाळ्यापूर्वी सुविधा उभारण्याची मागणी पावसाळ्यात अंत्यविधी करताना निर्माण होणाऱ्या अडचणी लक्षात घेता बारामती नगरपरिषद प्रशासनाने या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. उपलब्ध ११ गुंठे जागेवर तातडीने संरक्षक भिंत, अंत्यविधीसाठी शेड, चिता बांधणीची व्यवस्था, पाण्याची सुविधा, वीज आणि इतर आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी रुई ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
“मृत्यूनंतरही सन्मानाने अंत्यसंस्कार करण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाचा आहे. त्यामुळे रुई गावातील स्मशानभूमीचा प्रश्न आता केवळ विकासकामाचा विषय न राहता मानवी संवेदनशीलतेचा प्रश्न बनला आहे. बारामती नगरपरिषद प्रशासनाने विलंब न करता उपलब्ध जागेवर सुसज्ज स्मशानभूमी उभारून रुई ग्रामस्थांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.”





















