मेडद सरपंच गणेश काशीद प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी; समस्त नाभिक समाजाचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना निवेदन”
“खोट्या गुन्ह्यात अडकवू नका; एसआयटी चौकशीसाठी नाभिक समाजाचे उपमुख्यमंत्र्यांकडे निवेदन..!”
संपादक : सुरज देवकाते
बारामती (दि. २): मेडद (ता. बारामती) येथील लोकनियुक्त सरपंच गणेश दत्तात्रय काशीद यांच्या संदर्भातील प्रकरणाची निष्पक्ष, पारदर्शक व स्वतंत्र चौकशी करण्यात यावी तसेच त्यांच्यावर कोणताही अन्याय होऊ नये, अशी मागणी समस्त नाभिक समाज, बारामती तालुका यांच्या वतीने महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सौ. सुनेत्रा अजितदादा पवार यांच्याकडे सविस्तर निवेदनाद्वारे करण्यात आली.
नाभिक समाजाच्या वतीने सादर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सरपंच गणेश काशीद यांना कोणताही ठोस व विश्वासार्ह पुरावा नसताना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकविण्याचा प्रयत्न होत असल्याची गंभीर शंका समाजामध्ये व्यक्त होत आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांकडे न ठेवता विशेष तपास पथक (एसआयटी) मार्फत करण्यात यावा, जेणेकरून तपासावर कोणत्याही प्रकारचा संशय राहणार नाही आणि सत्य जनतेसमोर येईल.
तसेच, या प्रकरणात आवश्यक असल्यास कायद्यानुसार संबंधित व्यक्तींच्या संमतीने ब्रेन मॅपिंग, पॉलीग्राफ (लाई डिटेक्टर) तसेच इतर वैज्ञानिक तपास चाचण्यांचा वापर करून वस्तुस्थिती समोर आणावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. कोणत्याही निष्पाप व्यक्तीवर केवळ संशय, अफवा किंवा दबावाच्या आधारे कारवाई होऊ नये, तर केवळ ठोस पुरावे आणि कायदेशीर प्रक्रियेच्या आधारेच निर्णय घेतला जावा, अशी भूमिका समाजाने स्पष्ट केली आहे. निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, या प्रकरणात सत्य समोर येणे अत्यंत आवश्यक असून दोषी व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी. त्याचबरोबर निष्पाप व्यक्तींना न्याय मिळाला पाहिजे. न्यायव्यवस्थेवरील नागरिकांचा विश्वास कायम राहण्यासाठी निष्पक्ष आणि पारदर्शक तपास होणे गरजेचे असल्याचेही समाजाच्या वतीने अधोरेखित करण्यात आले.
उपमुख्यमंत्री सौ. सुनेत्रा अजितदादा पवार यांनी या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालून संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना निष्पक्ष चौकशीचे निर्देश द्यावेत आणि कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी विनंती समस्त नाभिक समाजाने केली आहे.
यावेळी समस्त नाभिक समाज, बारामती तालुक्याचे अध्यक्ष रोहन शहाजी शिंदे, उपाध्यक्ष अजित सुभाष यादव, कार्याध्यक्ष अनंत नारायण आपुणे, खजिनदार शिरीष मोहन काशीद, सचिव आदेश संजय आपुणे, ओबीसी सेल अध्यक्ष नवनाथ आपुणे, चेअरमन महेश वारुळे, संचालक राजू धोत्रे यांच्यासह समाजाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

✍🏻मुख्य संपादक – सुरज देवकाते





















