चेहऱ्यावर आनंदाची लकेर, नवा गणवेश अन् हातात तिरंगा; चिमुकल्यांच्या देशभक्तीने बारामती नगर परिषद शाळांचा परिसर दुमदुमला!
संपादक : सुरज देवकाते
बारामती (दि. १५ ): स्वातंत्र्यदिन… आणि चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचे निरागस हास्य! बारामती नगर परिषद शाळांमधील इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी नव्या गणवेशात टापटीप उपस्थित राहून भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरा केला.
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला विद्यार्थ्यांना नवीन गणवेशाचे वाटप करण्यात आले होते. काही अपरिहार्य कारणांमुळे तसेच तांत्रिक अडचणींमुळे गणवेश वाटपाला विलंब झाला होता. मात्र, नवीन गणवेश मिळाल्यानंतर चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि उत्साह पाहण्यासारखा होता.
आज सकाळी नव्या गणवेशात सजून आलेल्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत स्वातंत्र्यदिनाचा उत्साह द्विगुणित केला. तिरंग्याच्या साक्षीने विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण देशप्रेमाने भारून गेले. नव्या गणवेशातील चिमुकल्यांचे निरागस हास्य, डोळ्यांतील चमक आणि देशभक्तीचा उत्साह पाहून ‘आजचा आनंद म्हणजे उद्याच्या भारताच्या उज्ज्वल भविष्याची चाहूल’ असल्याची भावना उपस्थितांमध्ये निर्माण झाली.
———————————
“नगर परिषद शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला चांगल्या सुविधा, दर्जेदार शिक्षण आणि आनंददायी शैक्षणिक वातावरण मिळावे, हा आमचा सातत्याने प्रयत्न आहे. नवीन गणवेश परिधान करून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य पाहणे, हीच आमच्यासाठी सर्वात मोठी समाधानाची बाब आहे. या चिमुकल्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नगर परिषद सातत्याने प्रयत्नशील आहे.”
– सौ. श्वेता नाळे
उपनगराध्यक्ष तथा सभापती, शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती बारामती नगरपरिषद.
“आदरणीय अजितदादांनी कायमच नगरपालिकेतील विद्यार्थ्यांचे हित केंद्रस्थानी ठेवले. ‘आपला विद्यार्थी घडला पाहिजे’, हे अजितदादांचे स्वप्न होते. हे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आता आपल्या सर्वांची सामूहिक आहे. विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण, आवश्यक सुविधा आणि प्रोत्साहन मिळावे, यासाठी नगर परिषद सातत्याने काम करत आहे. या संपूर्ण प्रक्रियेवर श्रीमती सुनेत्रा वहिनी स्वतः बारकाईने लक्ष ठेवून असून, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे.”
– श्री. सचिन सातव
नगराध्यक्ष, बारामती नगर परिषद
“आचार संहिता कारणामुळे नगर परिषद द्वारे जर्नर बॉडीचा ठराव घेण्यास विलंब झाला होता. तरी देखील नगर परिषद द्वारे जलद गतीने सर्व प्रक्रिया राबून १५ ऑगस्टला विद्यार्थ्यांना उत्तम गुणवत्तेचे गणवेश उपलब्ध करून दिले आहे. यामध्ये सन्माननीय नगराध्यक्ष,उपनगराध्यक्ष यांच्या पाठपुराव्यामुळे गणवेश वेळेवर उपलब्ध करून देता आले.
– श्री.पंकज भुसे
मुख्याधिकारी, बारामती नगरपरिषद.

✍🏻मुख्य संपादक – सुरज देवकाते





















