नव्या पिढीला मिळावी विकासाची प्रेरणा; नगरपरिषदेत अजितदादांचा पुतळा उभारावा
संपादक : सुरज देवकाते
बारामती : बारामतीच्या सर्वांगीण विकासात मोलाचे योगदान देणारे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा अर्धाकृती पुतळा बारामती नगरपरिषदेच्या आवारात उभारावा, अशी मागणी राष्ट्रीय होलार समाज सेवा संघाच्या वतीने नगरसेवक गोरख पारसे यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंकज भुसे यांच्याकडे सादर केले.
बारामती शहराच्या विकासामध्ये अजितदादा पवार यांचे मोठे योगदान राहिले आहे. त्यांच्या प्रयत्नातून बारामती नगरपरिषदेला विविध विकासकामांसाठी वेळोवेळी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला. या निधीतून शहरातील रस्ते, वीज, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य, उद्याने, सुशोभीकरण आदी विविध क्षेत्रांत विकासकामे करण्यात आली. तसेच शहरात नागरिकांच्या सुविधांसाठी दर्जेदार शासकीय व प्रशासकीय इमारती उभारण्यात आल्या.बारामतीच्या विकासाचा वेग वाढविण्यात अजितदादांची दूरदृष्टी आणि प्रशासनावर असलेली पकड महत्त्वाची ठरली. त्यामुळे त्यांच्या कार्याची आणि विकासात्मक योगदानाची कायमस्वरूपी आठवण राहावी, तसेच नव्या पिढीला त्यांच्या कार्यातून प्रेरणा मिळावी, यासाठी नगरपरिषद आवारात त्यांचा अर्धाकृती पुतळा उभारणे उचित ठरेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
नगरपरिषद आवारात सध्या लालबहादूर शास्त्री यांचा पुतळा आहे. त्याच्या शेजारी अजितदादा पवार यांचा अर्धाकृती पुतळा उभारल्यास नगरपरिषदेत येणाऱ्या नागरिकांना, नगरसेवकांना तसेच अधिकारी कर्मचाऱ्यांना पुतळ्याचे दर्शन घेता येईल. त्यातून अजितदादांच्या कार्याची आणि बारामतीच्या विकासातील त्यांच्या योगदानाची पुढील पिढीला माहिती मिळेल, असा विश्वास नगरसेवक गोरख पारसे यांनी व्यक्त केला.
यावेळी पत्रकार सुरज देवकाते, निवृत्ती गोरे, हिरामण माने, संतोष जाधव, बाळासाहेब जाधव, शांताराम गुळवे, नारायण ढोबळे, बालाजी गुळवे, शेखर अहिवळे तसेच राष्ट्रीय होलार समाज सेवा संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

✍🏻मुख्य संपादक – सुरज देवकाते





















