भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; शाळेजवळ संशयास्पद हालचालींवरून पोलिसांची धडक
संपादक : सुरज देवकाते
भिगवण : पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मदनवाडी येथे कारवाई करत दोन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तुलांसह तीन जिवंत काडतुसे असा एकूण ४० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शाळेजवळ संशयास्पदरीत्या फिरत असताना ही कारवाई करण्यात आली.
कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी अवैध अग्निशस्त्रांचा वापर करून गुन्हे करणारे तसेच अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या आरोपींविरोधात विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैध अग्निशस्त्रे, गावठी पिस्तुले बाळगणारे व त्यांची खरेदी-विक्री करणाऱ्यांची माहिती घेत होते. विशेष मोहिमेअंतर्गत पथक भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना, मदनवाडी गावातील देवकाते वस्ती येथील जिल्हा परिषद शाळेजवळ दोन इसम संशयास्पदरीत्या फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.
माहिती मिळताच पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून कारवाईचे आदेश घेतले. त्यानंतर दोन्ही संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांची नावे अविनाश ऊर्फ धीरज अंकुश देवकाते (वय २३) आणि रोहन बाळासो गायकवाड (वय २२, दोघे रा. मदनवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे) अशी असल्याचे समोर आले.
पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया राबवत त्यांची अंगझडती घेतली असता प्रत्येकाजवळ अवैधरीत्या बाळगलेले एक गावठी पिस्तुल व तीन जिवंत काडतुसे आढळून आली. या कारवाईत एकूण ४० हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
दोन्ही आरोपींविरोधात भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २००/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३(५) तसेच शस्त्र कायदा कलम ३, २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गावठी पिस्तुले त्यांनी कोठून आणली, त्यांचा वापर कोणत्या कारणासाठी करणार होते आणि या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
या कारवाईत पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, बारामती विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार अजय घुले, योगेश नागरगोजे, निलेश शिंदे यांनी सहभाग घेतला. पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा व भिगवण पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात येत आहे.

✍🏻मुख्य संपादक – सुरज देवकाते





















